NCP Politics : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात गेल्या 72 तासांत घडामोडींना वेग आला असून पक्षांतर्गत मोठा संघर्ष उघडपणे समोर येताना दिसत आहे. सुनेत्रा पवार यांनी पक्षाची सूत्रे हातात घेतल्यानंतर ज्येष्ठ नेते प्रफ्फुल पटेल आणि सुनील तटकरे यांना संघटनेत दुय्यम स्थान दिल्याची चर्चा सुरू होती. त्यातच आता राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीतून दोन्ही नेत्यांची नावे वगळण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
याचदरम्यान दिल्लीतील राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयातून आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीत नाव नसलेल्या पदाधिकाऱ्यांना कार्यालयात प्रवेश नाकारण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. इतकेच नाही तर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या केबिनलाही कुलूप लावण्यात आल्याची चर्चा आहे. पक्षाचे राष्ट्रीय सचिव अविनाश आदिक यांनी दिल्ली कार्यालयात बैठक घेतल्यानंतर हे तोंडी आदेश देण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
या नव्या आदेशांनुसार, राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य नसलेल्या व्यक्तींना पक्ष कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही. आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पक्षांतर्गत शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटात अंतर्गत संघर्ष अधिक तीव्र झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, 12 मे रोजी शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी सुनील तटकरे यांनी अचानक भेट दिली होती. विशेष म्हणजे, त्याआधीच प्रफुल्ल पटेल हेही तेथे उपस्थित असल्याची माहिती समोर आली. या भेटीबाबत कोणालाही आधी कल्पना नसल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चा सुरू असतानाच या गुप्त बैठका आणि दिल्लीतील घडामोडींमुळे पक्षात पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरू असल्याची चर्चा रंगू लागली आहे.


