Pimpri-Chichwad Crime: पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, शुक्रवारी रात्री पिंपरी-चिंचवड परिसरात एका खळबळजनक घटनेने खळबळ उडाली. लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या शार्प शूटर्सनी येथील प्रसिद्ध ‘एजे’ फर्निचर मॉलला लक्ष्य करत बेछूट गोळीबार केला. या घटनेनंतर गँगचा सक्रिय सदस्य शुभम लोणकर याने सोशल मीडियावर पोस्ट टाकत या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे, ज्यामुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री ९:२४ च्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी एजे मॉल गाठले. अवघ्या काही सेकंदात त्यांनी आपल्याकडील शस्त्रातून मॉलच्या नेमप्लेटच्या दिशेने पाच ते सहा राऊंड फायर केले. सुदैवाने, या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मॉलच्या काचा फुटून मोठे नुकसान झाले आहे. घटनेनंतर आरोपी वेगाने पसार झाले.
फेसबुक पोस्टद्वारे ‘फायनल वॉर्निंग’
या गोळीबाराचे गांभीर्य अधिक वाढले ते शुभम लोणकरच्या दाव्यामुळे. त्याने फेसबुक पोस्टद्वारे या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारताना मॉलचे मालक अशोक नैन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “हा फक्त ट्रेलर होता, पुढची गोळी थेट डोक्यात असेल,” अशा शब्दांत बिश्नोई गँगने व्यावसायिकाला अंतिम इशारा दिला आहे. दरम्यान, लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ आरजू बिश्नोई याच्या नावाने एक ऑडिओ क्लिपही व्हायरल होत असून, त्यात विरोधकांना संपवण्याची धमकी देण्यात आली आहे.
पोलीस तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवडचे वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून फॉरेन्सिक टीमनेही पुरावे गोळा केले आहेत. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची विविध पथके रवाना करण्यात आली असून, सीसीटीव्हीच्या आधारे त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त गणेश इंगवले यांनी दिली.


