Pune Crime : पुण्यातील पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाअंतर्गत बावधन पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका महिला सहाय्यक पोलीस निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात अटक केली आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या अधिकाऱ्याचं नाव ज्योती पांडुरंग तांबे (वय 41) असे आहे. त्या बावधन पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, गुन्ह्याच्या तपासात मदत करणे, नातेवाईकांची अटक टाळणे आणि दोषारोपपत्र लवकर दाखल करण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडे 50 हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. तक्रारदाराच्या तक्रारीनंतर ACB ने पडताळणी करून सापळा रचला आणि कारवाई केली.
तपासादरम्यान संबंधित अधिकाऱ्याने यापूर्वीही लाचेची मागणी केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ACB कडून सुरू आहे.


