पुणे : शहरात गेल्या काही काळात हुंडाबळी, कौटुंबिक हिंसाचार आणि पत्नीला घराबाहेर काढण्याच्या घटनांनी समाजमन सुन्न केले आहे. अशातच एका धक्कादायक प्रकरणाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. अवघ्या दीड महिन्यांच्या वैवाहिक जीवनानंतर पतीने “तू पसंत नाहीस” आणि “हुंडा-मानपान झाला नाही” अशी कारणे देत नववधूला घराबाहेर काढले.
या प्रकरणात पतीसह सासरच्या मंडळींनी न्यायालयात एकरकमी 45 लाख रुपये पोटगी देण्याची तयारी दर्शवली, ज्यामुळे हा घटस्फोट पुण्यातील सर्वात महागड्या घटस्फोटांपैकी एक ठरला आहे. या तडजोडीमुळे नववधूने सासरच्या मंडळींविरोधातील कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप मागे घेतले, आणि वर्षभर चाललेल्या या वादाला अखेर पूर्णविराम मिळाला.
थाटामाटात लग्न, पण दीड महिन्यातच वाद
या दाम्पत्याचा विवाह जानेवारी 2022 मध्ये मोठ्या थाटामाटात पार पडला. मात्र, नववधू सासरी गेल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच घरात वादाला सुरुवात झाली. सासरकडून हुंडा आणि मानपान झाला नसल्याची कुरकुर सुरू झाली. पतीने थेट पत्नीला “तू मला पसंत नाहीस, हे लग्न मी घरच्यांच्या दबावाखाली केले” असे सांगत सतत टोमणे मारण्यास सुरुवात केली. या सततच्या अपमानामुळे पती-पत्नीतील संबंध ताणले गेले, आणि अखेरीस सासरच्या मंडळींनी नववधूला घराबाहेर काढल्याचा आरोप तिने केला.
नववधूने पती, सासू, सासरे आणि नणंदेविरोधात भोसरी पोलिस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली. पोलिसांनी चौकशीअंती संबंधितांवर गुन्हा दाखल करत न्यायालयात आरोपपत्र सादर केले. यानंतर प्रकरणाने न्यायालयीन वळण घेतले. पत्नीची बाजू मांडणाऱ्या ॲड. प्रियांका काटकर आणि ॲड. रेश्मा सोनार यांनी दोन्ही पक्षांमध्ये समुपदेशन केले. या प्रक्रियेतून तडजोडीचा मार्ग निघाला. पतीने एकरकमी 45 लाख रुपये पोटगी देण्याची तयारी दर्शवली, तर पत्नीने सकारात्मक प्रतिसाद देत कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप मागे घेतले.
परस्पर संमतीने घटस्फोट मंजूर
पोटगीच्या तडजोडीमुळे वाद मिटल्यानंतर दोन्ही पक्षांनी परस्पर संमतीने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. न्यायालयाने यावर सुनावणी करत घटस्फोटाला मंजुरी दिली, आणि सासरच्या मंडळींना कायदेशीर मुक्तता मिळाली. अशा प्रकारे वर्षभर चाललेल्या या कौटुंबिक आणि कायदेशीर लढाईला अखेर पूर्णविराम मिळाला.
पुण्यात चर्चेचा विषय
या प्रकरणाने पुणे शहरात खळबळ उडवली आहे. अवघ्या 45 दिवसांत संसार मोडून 45 लाख रुपये पोटगी देण्याच्या या घटनेमुळे हा घटस्फोट शहरातील सर्वात महागड्या घटस्फोटांपैकी एक मानला जात आहे. यासोबतच, कौटुंबिक वाद, हुंड्याच्या तक्रारी आणि पती-पत्नीमधील विश्वासाचा अभाव यांसारख्या सामाजिक समस्यांवर पुन्हा एकदा प्रकाश पडला आहे. समुपदेशन आणि तडजोडीच्या माध्यमातून या प्रकरणाचा शांततापूर्ण निपटारा झाला असला, तरी समाजात अशा घटनांना आळा घालण्यासाठी अधिक जागरूकता आणि संवेदनशीलतेची गरज असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.


