पुणे : महाराष्ट्रात महापालिका निवडणुकांची तयारी जोरात सुरू असताना पुण्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे पुणे शहर उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते मुख्तार शेख यांनी आपले चिरंजीव विकार अहमद शेख यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत (अजित पवार गट) प्रवेश केला आहे. हा प्रवेश महायुतीला मजबुती देणारा मानला जात आहे.
गेल्या ४० वर्षांपासून काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते असलेले मुख्तार शेख यांनी दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून येऊन पुणे महापालिकेत नागरिकांचे प्रतिनिधित्व केले आहे. १९९२ पासून त्यांनी पक्षासाठी अथक काम केले. लोकसभा, विधानसभा तसेच प्रत्येक महापालिका निवडणुकीत पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात अल्पसंख्याक समाजात काँग्रेसची ताकद वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर मुख्तार शेख यांनी सांगितले की, काँग्रेसने अल्पसंख्याक समाजाला नेतृत्व करण्याची संधी दिली नाही. त्यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना भेटून अल्पसंख्याक प्रतिनिधीसाठी एमएलसी जागेची विनंती केली होती, मात्र ती इतरांना देण्यात आली आणि नंतर त्या व्यक्तीनेही पक्ष सोडला. निष्ठावंत कार्यकर्त्यांची उपेक्षा झाल्याने हा निर्णय घेतला.
त्यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाची प्रशंसा करत म्हटले की, अजित पवार ‘सर्व धर्म समभाव’ मानतात आणि अल्पसंख्याक नेत्यांना आमदार, एमएलसी, मंत्री पदे तसेच महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देऊन सक्षम केले आहे. येत्या पुणे महापालिका निवडणुकीत संपूर्ण समाजाला सोबत घेऊन राष्ट्रवादीला मजबूत करण्याचा प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले.
या प्रवेशामुळे पुण्यातील काँग्रेसच्या पारंपरिक मतपेढीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटप चर्चा सुरू असतानाच हा पक्षांतराचा धक्का काँग्रेससाठी मोठा मानला जात आहे. दुसरीकडे महायुतीत भाजप-शिवसेना एकत्र लढत असली तरी अजित पवार गटाची स्वतंत्र तयारी सुरू आहे.


