मावळ : मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (अजित पवार गट) पहिली उमेदवारी जाहीर केली आहे. कामशेत येथे आयोजित विशेष कार्यक्रमात मावळचे आमदार सुनील शेळके यांनी कामशेत-खडकाळा गटातून दीपाली दीपक हुलावळे यांची जिल्हा परिषद उमेदवार म्हणून अधिकृत घोषणा केली.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दीपाली हुलावळे या स्थानिक स्तरावर सक्रिय असून, त्यांच्या उमेदवारीमुळे पक्षाला बळकटी मिळेल, असा विश्वास आमदार शेळके यांनी व्यक्त केला. निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेसने मावळातून आक्रमक सुरुवात केली असून, लवकरच इतर गटांतील उमेदवारांच्या नावांची घोषणा होण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीतील स्पर्धा तीव्र होत असताना, राष्ट्रवादीची ही पहिली उमेदवारी पक्षाच्या तयारीचे संकेत देत आहे.


