Maharashtra Rain : महाराष्ट्रात मॉन्सूनने पुन्हा जोर धरला असून, आज (28 ऑगस्ट) राज्याच्या विविध भागांत हवामान विभागाने दक्षतेचे इशारे जारी केले आहेत. विशेषतः मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असल्याने या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
कोकण किनारपट्टी, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला असून, बहुतांश भागांत येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाला चालना मिळाली असून, येत्या काही दिवसांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.
घाटमाथ्यावर मुसळधार, कोकणात जोरदार सरी
पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावरील भागांत आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. या भागातील नागरिक आणि प्रवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू आहे. मात्र, आजपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील नाशिकच्या घाटमाथ्यासह मराठवाड्यातील जालना, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांतही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
विदर्भात वादळी पाऊस, चंद्रपूरमध्ये उच्चांकी पर्जन्य
विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये पूर्व विदर्भात जोरदार पावसाची नोंद झाली. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही येथे तब्बल 111 मिलिमीटर पावसाची नोंद झाली, जी राज्यातील सर्वाधिक आहे. याशिवाय, नागपूर शहराने बुधवारी 32.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवून राज्यातील उच्चांक गाठला.
मॉन्सूनला पुन्हा बळ, सप्टेंबरमध्येही जोर कायम
गेल्या काही दिवसांपासून मॉन्सून काहीसा मंदावला होता. मात्र, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मॉन्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर या कमी दाबाचा परिणाम मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मॉन्सून अधिक जोमाने सक्रिय होईल. राज्यातील बहुतांश भागांत विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम सरी पडतील, तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.


