पुणे: सांगवी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पिंपळे सौदागर परिसरात पोलिसांकडून 10 किलो 138 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. हरिश मगन सोनवणे (वय 27 वर्षे, रा काळभैरवनगर, यशस्वी हौसिंग सोसायटी, फ्लॅट क्र 12, पिंपरी गाव, पिंपरी पुणे मुळ रा. मौजे शिरपुर, वरवाडे, संत सावतामाळी चौक, ता शिरपुर जि धुळे) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरुध्द सांगवी पोलीस स्टेशन येथे एनडीपीस अॅक्ट कलम 8 (क), 20 (ब) (ii) (ब), 29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 मार्च रोजी सहाय्यक पोलिस निरीक्षक विक्रम गायकवाड, पोलीस अंमलदार जावेद बागसिराज, किशोर परदेशी, मयुर वाडकर, प्रसाद कलाटे, गणेश कर्षे आणि विजय दौड़कर हे सांगवी पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपळे सौदागर भागामध्ये पेट्रोलींग करीत होते. त्यावेळी प्रथम रेस्ट्रो बारच्या समोर, तेथील पाण्याच्या टाकीच्या कंपाऊंडच्या शेजारी असलेल्या रस्त्याच्या कडेला पोलीस अंमलदार विजय दौंडकर व प्रसाद कलाटे यांना एक इसम ज्युपीटर या दुचाकी गाडीवर पाठीवर बॅग व गाडीच्या पुढील बाजुस ट्रॅव्हलिंग बॅग घेवुन थांबलेला दिसला. त्याला तेथे थांबण्याचे कारण विचारले असता हरिश उडवाउडवीची उत्तरे देवु लागला. त्याचे वागणे संशयास्पद असल्याने त्याच्याकडे अधिक चौकशी करून त्याची झडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे असलेल्या सॅक व ट्रॅव्हलींग बॅगमध्ये 10 किलो 138 ग्रम गांजा मिळुन आला. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत 10 किलो 138 ग्रॅम गांजा, 2 मोबाईल व ज्युपिटर असा माल पंचांसमक्ष जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त, शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त संदिप डोईफोडे, सहा पोलीस आयुक्त विशाल हिरे, सहा पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहा पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड, पोलीस अंमलदार जावेद बागसिराज, किशोर परदेशी, मयुर वाडकर, प्रसाद कलाटे, गणेश कर्षे व विजय दौडकर यांच्या पथकाने केली आहे.


