पुणे : भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षकपदी अखेर राज्य सरकारने प्रभाकर मुसळे यांची नियुक्ती केली आहे. गेले दोन ते तीन महिने हे पद रिक्त होते. तत्कालीन जिल्हा अधीक्षक सूर्यकांत मोरे यांनी अपिलांचे निर्णय देताना पक्षपातीपणा करीत काही निकाल संगनमत करून बदलले.
मोजण्यांच्या तारखांमध्ये बदल केले. मोरे यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असताना त्यांनी मंत्रालय स्तरावर संगनमत करून एक वर्ष मुदतवाढ घेतली. अशा स्वरूपाच्या तक्रारी आल्यानंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चौकशी करण्याचे आदेश जमाबंदी आयुक्त तथा भूमी अभिलेख संचालक डॉ. सुहास दिवसे यांना दिले होते.
बावनकुळे यांच्या आदेशानंतर दिवसे यांनी याबाबत उपसंचालक कमलाकर हट्टेकर यांच्या अध्यक्षतेखालील ६ जणांच्या समितीला मोरे यांच्या जिल्हा अधीक्षक कार्यकाळातील सर्वच प्रकरणांची चौकशी करण्याचे आदेश दिले. मात्र, ही चौकशी पूर्ण होण्यापूर्वीच राज्य सरकारने मोरे यांना उपसंचालक म्हणून पदोन्नती दिली आहे. त्यानंतर त्यांची चौकशी सुरूच राहील, असे दिवसे यांनी स्पष्ट केले होते. आता राज्य सरकारने प्रभाकर मुसळे यांची नियुक्ती केली आहे.
मुसळे हे नवी मुंबईतील सिडकोच्या प्रकल्पात जिल्हा अधीक्षक म्हणून प्रतिनियुक्तीने कार्यरत होते. त्यांना आता महत्त्वाच्या अशा पुणे जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच हवेलीच्या उपअधीक्षकपदी विकास गोफणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गोफणे हे सध्या भोर येथे उपअधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. हवेलीमध्ये गोफणे यांच्यापूर्वी अमर पाटील कार्यरत होते.


