पुणे : पुण्यातील हांडेवाडी चौक ते मंतरवाडी चौक मार्गावरील शेल पेट्रोल पंपाजवळ झालेल्या भीषण अपघातात बजाज पल्सर मोटरसायकलवरील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ट्रकखाली चिरडल्याने घडलेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मृतांची ओळख पटविण्यात आली असून, त्यांचे मृतदेह पुढील तपासासाठी ससून हॉस्पिटल येथे हलविण्यात आले आहेत.
फुरसुंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि ट्रक चालकाला ताब्यात घेतलं आहे. प्राथमिक तपासात ट्रकच्या बेदरकार चालकामुळे हा अपघात घडल्याचं दिसत आहे. पोलिसांनी ट्रक जप्त करून पुढील कारवाई सुरू केली आहे. घटनास्थळी काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती, पण पोलिसांनी ती तातडीने सुरळीत केली.
पुणे शहरात दिवसा जड वाहनांवर बंदी असतानाही हांडेवाडी परिसरात ट्रक आणि इतर जड वाहनांची वर्दळ कायम आहे. या अपघाताने स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. “जड वाहनांमुळे वारंवार अपघात होत आहेत. प्रशासनाने ट्रक चालक आणि मालकांवर कठोर कारवाई करावी,” अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यापूर्वीही पुण्यातील विविध चौकांमध्ये अशा दुर्घटना घडल्या असून, रस्ता सुरक्षा आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.


