पुणे : पुणे ते छत्रपती संभाजीनगर यांना जोडणारा नवा 10 लेन एक्सप्रेसवे लवकरच वास्तवात उतरणार आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (MSIDC) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर वेगाने काम करत आहे. हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर सध्या ८ ते १० तासांचा प्रवास फक्त ३ तासांत पूर्ण होणार आहे.
एक्सप्रेसवेचा प्रकल्प तीन टप्प्यांत पूर्ण होणार असून, पहिल्या टप्प्याचे काम सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यासाठी आर्थिक निविदा जारी करण्यात आली असून, लवकरच करारावर स्वाक्षरी होऊन प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार आहे.
या महामार्गात पुणे ते शिरूर उन्नत मार्ग, तसेच शिरूर ते छत्रपती संभाजीनगरपर्यंत सहा पदरी ग्रीनफिल्ड मार्ग तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवासाचा वेळ कमी होण्यासोबतच दोन्ही शहरांतील दळणवळण, व्यापार आणि पर्यटनालाही गती मिळेल.
पुणे आणि संभाजीनगर ही शहरे नोकरी, शिक्षण आणि व्यापारासाठी एकमेकांशी घट्ट जोडलेली आहेत. त्यामुळे हा एक्सप्रेसवे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा यांच्या आर्थिक विकासासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.


