Pune Crime News : पुणे जिल्ह्यात एक गंभीर आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पार पाडणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यालाच सासरच्या मंडळींकडून मानसिक व शारीरिक छळ सहन करावा लागत असल्याचे उघड झाले आहे.
प्रियंका खबाले (वय २५), या पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयात कार्यरत असून त्यांनी पतीसह सहा जणांविरुद्ध उरुळी कांचन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
डिसेंबर २०२१ मध्ये विवाह झाल्यानंतर सुरुवातीला सर्व काही सुरळीत होते. मात्र नंतर सासरकडून छळ सुरू झाला. आजारी असताना योग्य उपचार न करता माहेरी पाठवण्यात आले. पुढील शिक्षणासाठी त्यांनी संगणक क्लास सुरू केला असता त्याला विरोध करण्यात आला. पोलीस भरतीची तयारी करत असताना पतीने धमकी दिल्याचेही समोर आले.
२०२३ मध्ये पोलीस सेवेत दाखल झाल्यानंतरही छळ सुरूच राहिला. पगार असूनही चारित्र्यावर संशय घेत मारहाण करण्यात आली. अखेर त्यांनी पोलिसांत धाव घेतली असून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


