Pune Crime: पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटना वाढत असतानाच कोथरूड परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. केवळ एका अल्पवयीन मुलीशी असलेल्या मैत्रीच्या रागातून 23 वर्षीय तरुणाची अमानुष मारहाण करून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण पुणे शहरात संताप आणि खळबळ निर्माण झाली आहे. मृत तरुणाचे नाव नागेश संजय जाधव (वय 23) असे असून तो शिवाजीनगर परिसरातील वडारवाडी येथे राहत होता. नागेश हा शिवाजीनगर भागात ऑफिस बॉय म्हणून काम करत होता आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यात आईला मदत करत होता.
या प्रकरणाबाबत पुणे पोलीस आयुक्त मिलिंद मोहिते यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले, या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेमुळे पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नेमकं काय घडलं ?
14 मार्च 2026 रोजी सायंकाळी सुमारे 7.15 वाजण्याच्या सुमारास नागेशला मोबाईलवर फोन आला. फोन आल्यानंतर तो घरातून मोटरसायकलवरून बाहेर पडला. काही वेळानंतर रात्री सुमारे 8 वाजता नागेशच्या मोबाईलवरूनच त्याच्या आईला फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने शिवीगाळ करत नागेशला कोथरूडमधील मेगासिटी परिसरात मारहाण केल्याचे सांगितले आणि 10 मिनिटांत येऊन तुमचा मुलगा घेऊन जा, नाहीतर खाली फेकून देऊ अशी धमकी दिली. यानंतर नागेशची आई आणि काही नातेवाईक तातडीने कोथरूडमधील मेगासिटी परिसरात पोहोचले. तेव्हा परिसरात मोठी गर्दी जमली होती. नागेशला इमारतीच्या टेरेसवर मारहाण सुरू असल्याची माहिती त्यांना मिळाली. नातेवाईक टेरेसवर पोहोचले असता नागेश गंभीर जखमी अवस्थेत खाली पडलेला होता. त्याचे कपडे फाटलेले होते आणि आजूबाजूला लाकडी दांडके पडलेले होते. काही महिला आणि पुरुष त्याला मारहाण करत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू
नातेवाईकांनी नागेशला तातडीने रिक्षातून गोखलेनगर येथील रत्ना हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र त्याची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला त्वरित ससून रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. ससून रुग्णालयात उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी नागेशला मृत घोषित केले.
हेही वाचा – Pune Crime News : पुण्यात प्रेमप्रकरणाचा भयानक अंत; प्रेयसीच्या कुटुंबीयांनी प्रियकराला संपवलं
मैत्रीच्या कारणावरून हल्ला
तक्रारीनुसार नागेश आणि त्या अल्पवयीन मुलीमध्ये मैत्री होती. ते एकमेकांशी फोनवर बोलत असत आणि अधूनमधून भेटतही होते. याच कारणावरून मुलीच्या कुटुंबीयांनी नागेशला घरी बोलावून घेतल्याचा आरोप आहे. त्यानंतर मुलीच्या कुटुंबातील काही सदस्य आणि इतरांनी मिळून नागेशवर लाकडी दांडक्यांनी तसेच लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण केली. या मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.


