पुणे : पुणे जिल्हा परिषदेतील लाच प्रकरणी बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता बाबूराव पवार यांच्यासह उपअभियंत्याला निलंबित करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाने काढले आहेत. त्याशिवाय आणखी एका कनिष्ठ अभियंत्याला जिल्हा परिषदेने यापूर्वीच निलंबित केले आहे. यामुळे आता जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील (दक्षिण) कार्यकारी अभियंता बाबूराव पवार, उपअभियंता दत्तात्रय पठारे आणि कनिष्ठ अभियंता अंजली बगाडे या तीन अधिकाऱ्यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यापैकी कनिष्ठ अभियंता बगाडे यांना मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी निलंबित करण्याचे आदेश दिले. तसेच कार्यकारी अभियंता पवार आणि पठारे हे दोन्ही अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सेवेंतर्गत कार्यरत आहेत. त्यामुळे त्या दोघा अधिकाऱ्यांना निलंबन करण्याचा अधिकार जिल्हा परिषदेऐवजी बांधकाम विभागाला आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने त्यांच्या निलंबनाबाबतचा प्रस्ताव बांधकाम विभागाकडे पाठविला होता. त्याबाबत बांधकाम विभागाने राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविला. या प्रस्तावानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने बाबूराव पवार आणि पठारे यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले आहेत. बाबूराव पवार यांच्यासह तिघांना आता निलंबन करण्याची जिल्हा परिषदेच्या इतिहासातील ही मोठी कारवाई मानली जाते.
या पार्श्वभूमीवर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी बांधकाम विभागासह जिल्हा परिषदेतील विविध विभागांची झाडाझडती घेण्यास सुरूवात केली आहे. कर्मचारी, अधिकाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. दरम्यान, यासंदर्भात जिल्हा परिषद प्रशासनापर्यंत अद्याप बांधकाम विभागाकडून निलंबनाचे आदेश प्राप्त झाले नसल्याचे सांगण्यात आले.


