पुणे : पुण्यातील खराडीतील रेव्ह पार्टी प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांच्यावर कारवाई सुरू असताना आता रोहिणी खडसे यांच्यावरही संशयाचे सावट कोरले आहे. खेवलकरच्या मोबाइलमधील व्हॉट्सअॅप डेटा डिलिट झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी कोर्टात याबाबत नवी माहिती सादर केली आहे. या प्रकरणात रोहिणी खडसे यांच्यावर पोलिसांचा संशय असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे त्या अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
प्रांजल खेवलकरांचा मोबाइल डेटा डिलिट
पुणे पोलिसांनी प्रांजल खेवलकरकडून दोन मोबाइल फोन जप्त केले होते, ज्यापैकी एका नंबरचे नाव ‘सोनार’ या व्यक्तीच्या नावावर नोंदवले गेले होते. तपासात असे समोर आले की, सोनार या व्यक्तीने काही दिवसांपूर्वी आपली सिमकार्ड हरवले असल्याचे सांगून तीच सिम पुन्हा मिळवली. त्यानंतर त्या सिमवर नव्याने व्हॉट्सअॅप डाउनलोड करून सर्व डेटा डिलिट केला गेला.
परिणामी, पोलिसांकडे जप्त केलेल्या खेवलकरच्या मोबाइलमधील व्हॉट्सअॅप डेटा नष्ट झाला. या संपूर्ण प्रकारामागे रोहिणी खडसे यांचा हात असल्याचा संशय पोलिसांना आहे. यापूर्वी, तपासात 252 व्हिडिओ आणि 1,497 न्यूड फोटोंचा उल्लेख समोर आला होता, ज्यामुळे प्रकरणाची गंभीरता आणखी वाढली आहे.
रोहिणी खडसे यांना सहआरोपीची शक्यता
खेवलकरच्या मोबाइल डेटा डिलिट करण्यामागे रोहिणी खडसे यांनीच सोनार यांच्यामार्फत कारवाई केली असावी. या संशयामुळे सोनार या व्यक्तीसह रोहिणी खडसे यांना प्रकरणात सहआरोपी म्हणून समाविष्ट करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी कोर्टात याबाबत माहिती सादर केली असून, तपासाला वेग मिळाला आहे. या प्रकरणात खराडीतील रेव्ह पार्टीत ड्रग्स, हुकाह आणि अल्कोहोलचा वापर झाल्याचे आधीच समोर आले आहे, आणि आता डेटा डिलिटचा हा प्रकार तपासाला नवे वळण देत आहे.


