Harshvardhan Sadgir : पुणे जिल्ह्यातील वाघोली येथे पार पडलेल्या 68 व्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेत हर्षवर्धन सदगीर याने विजेतेपद पटकावत मोठी कामगिरी केली. सोलापूरच्या महेंद्र गायकवाड याचा अटीतटीच्या लढतीत 4-3 असा पराभव करत सदगीरने महाराष्ट्र केसरीची मानाची गदा जिंकली.
या विजयासह सदगीर ‘डबल महाराष्ट्र केसरी’ ठरला. मात्र, या ऐतिहासिक यशानंतर लगेचच त्याने कुस्तीतून निवृत्ती जाहीर करत सर्वांनाच धक्का दिला.
“मी स्वखुशीने मॅटवरील कुस्तीमधून निवृत्ती घेत आहे,” अशी घोषणा करताना सदगीरने शासनावरही नाराजी व्यक्त केली. 2019-20 मध्ये महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर शासकीय नोकरीची अपेक्षा होती, मात्र ती मिळाली नाही, असा आरोप त्याने केला.
तो म्हणाला की, “मी एकनाथ शिंदे आणि इतर नेत्यांना भेटलो, पण मला नोकरी मिळाली नाही. मी गरीब घरातून आलो आहे. त्या वेळी मला आधाराची गरज होती. पण आज मी माझ्या जोरावर पुन्हा महाराष्ट्र केसरी झालो. आता मला नोकरीची गरज नाही.”
यावेळी त्याने काही लोकांनी आपल्याला संपलेला पैलवान समजले होते, असा दावा करत आपल्या जिद्दीने हे यश मिळवल्याचे सांगितले. तसेच, प्रतिस्पर्धी महेंद्र गायकवाडला लहान भाऊ मानत सामनाही अत्यंत चुरशीचा झाल्याचे तो म्हणाला.
दरम्यान, या विजयानंतर सदगीरला मानाची गदा, टोयोटा फॉर्च्युनर कार आणि 5 लाख रुपयांचे बक्षीस मिळाले. मात्र, या आनंदाच्या क्षणी घेतलेल्या निवृत्तीच्या निर्णयामुळे कुस्ती क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे.


