पुणे : पुरंदर तालुक्यातील भिवरी आणि बापदेव घाट परिसरात घडलेल्या घटनांच्या निषेधार्थ आज (8 एप्रिल) सकल हिंदू समाजाच्या वतीने ‘हिंदू जनआक्रोश मोर्चा’चे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चामुळे वाहतुकीवर परिणाम होणार असून खबरदारीचा उपाय म्हणून खडी मशीन चौक ते सासवड हा मार्ग सकाळी 7 वाजल्यापासून पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे.
या मोर्चामधून भिवरी आणि बापदेव घाट परिसरात दहशत पसरवणाऱ्या टोळक्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जाणार आहे. तसेच पुणे आणि कोंढवा परिसरातील आरोपींना तात्काळ अटक करावी, भिवरीतील ग्रामस्थांवरील गुन्हे मागे घ्यावेत आणि कथित लँड जिहाद प्रकरणांची चौकशी व्हावी, अशा प्रमुख मागण्या यावेळी मांडल्या जाणार आहेत.
मोर्चा सकाळी 10 वाजता सासवड येथील शिवतीर्थावरून सुरू होऊन सासवड-भिवरी-बापदेव घाट मार्गे खडी मशीन चौक, कोंढवा येथे पोहोचणार आहे. मोठ्या संख्येने नागरिक या मोर्चात सहभागी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी पर्यायी मार्ग जाहीर केला आहे. खडी मशीन चौक > उंड्री चौक > मंतरवाडी फाटा > दिवेघाट > सासवड हा मार्ग वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सासवडकडे जाणाऱ्या प्रवाशांनी विशेषतः दिवेघाट मार्गाचा वापर करावा, असेही सांगण्यात आले आहे.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


