पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात मोठी खळबळ उडाली आहे. पक्षाच्या पिंपरी विधानसभा समन्वयक असलेल्या एका महिला पदाधिकाऱ्याने गुरुवारी (१ जानेवारी) पत्रकार परिषद घेऊन माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख ॲड. गौतम चाबूकस्वार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “चाबूकस्वारांनी वारंवार शरीरसुखाची मागणी केली, विनयभंग केला. मागणी पूर्ण न केल्याने महापालिकेचे तिकीट कापले,” असा धक्कादायक दावा महिलेने केला आहे.
महिला पदाधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या ८ वर्षांपासून पक्षात काम करत आहे. प्रभाग क्रमांक ३० मधून तिकीट अपेक्षित होते. मात्र, चाबूकस्वारांनी कार्यालयात, लोकसभा प्रचारादरम्यान लिफ्टमध्ये आणि आकुर्डी कार्यालयात अश्लील हावभाव करून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. “जे दाखवायचे ते दाखवत नाहीस,” असे बोलून विनयभंग केला. धमकी दिली की, “तुला आयुष्यातून उठवेन.” मागणी नाकारल्याने तिकीट कापले, असा आरोप आहे.
दरम्यान, गौतम चाबूकस्वार यांनी हे आरोप पूर्णपणे फेटाळले आहेत. ते म्हणाले, “हे आरोप निराधार, गलिच्छ आणि खोडसाळपणाचे आहेत. मी कोअर कमिटीचा अध्यक्ष म्हणून उमेदवार निवड प्रक्रियेत सहभागी होतो. या महिलेला दापोडी प्रभागातून तिकीट मिळाले नाही, म्हणून हे आरोप केले आहेत. मी पक्षाच्या वरिष्ठांकडे तक्रार केली आहे. योग्य कारवाई होईल.”
या घटनेमुळे ठाकरे सेनेत अंतर्गत कलह उघड झाला आहे. महापालिका निवडणुकीत ठाकरे सेना-मनसे युती लढत असताना हा आरोप पक्षाच्या प्रतिमेला धक्का देणारा मानला जात आहे. पोलिसांत तक्रार दाखल होण्याची शक्यता आहे. राजकीय वर्तुळात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.


