Thane Municipal Election 2026: राज्यात महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळी शिगेला पोहचली असतानाच राजकीय समीकरणेही वेगाने बदलत आहेत. आता ठाणे जिल्ह्यात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. जागावाटपावरून निर्माण झालेला पेच न सुटल्याने अखेर ठाण्यात महाविकास आघाडीत फूट पडली आहे. ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस ठाण्यात स्वबळावर लढणार असल्याची माहिती दिली.
जागावाटपाचा तिढा राहिला कायम
महानगरपालिका निवडणुकीसाठी गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू होती. काँग्रेसने ठाणे जिल्ह्यात सन्मानजनक जागांची मागणी केली होती. मात्र, शिवसेना ठाकरे गट आणि मनसेने काँग्रेसला जास्त जागा देण्यास नकार दिला. वारंवार चर्चा करूनही जागावाटपाचा तिढा सुटत नसल्याने अखेर काँग्रेसने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती विक्रांत चव्हाण यांनी दिली.
कळवा, मुंब्रा येथे स्वबळावर लढणार
विक्रांत चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, कळबा आणि मुंब्रा येथे काँग्रेस आपले पूर्ण ताकदीनिशी उमेदवार उतरवणार असून येथे स्वबळावर लढणार आहे. तसेच ठाण्यातील अन्य महत्त्वाच्या जागांवरही काँग्रेसचे उमेदवार अर्ज भरणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, मुंबई पाठोपाठ आता ठाण्यातही महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना न राहता, अनेक ठिकाणी तिरंगी किंवा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहेत.


