Pune Cold Weather : पुणे शहरात गेल्या काही दिवसांत थंडीचा जोर पुन्हा वाढला आहे. काही दिवसांपूर्वी किमान तापमानात वाढ झाल्याने थंडी ओसरली होती, मात्र आता पुन्हा तापमान घसरल्याने पहाटे आणि रात्री गारठा जाणवत आहे. कोरडे वातावरण, निरभ्र आकाश आणि विरळ धुके यामुळे शहरात गारवा कायम आहे.
शनिवारी (२० डिसेंबर) पुणे आणि परिसरात किमान तापमान ८.१ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, तर कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहिले. पहाटे विरळ धुके पडले, तर दिवसभर आकाश निरभ्र राहिले. यामुळे हवेत थंडीचा कडाका जाणवत होता.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस हवामान स्थिर राहणार आहे. रविवारी (२१ डिसेंबर) किमान तापमान सुमारे ९ अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपार आणि सायंकाळी अंशतः ढगाळ होण्याची शक्यता आहे.
या थंडीमुळे पुणेकरांना सकाळी आणि रात्री उबारा घ्यावा लागत आहे. हवामान विभागाने सांगितले की, पुढील काही दिवस थंडी कायम राहण्याची शक्यता आहे, नंतर मात्र तापमानात किंचित वाढ होऊ शकते.


