Pune Gunjavani dam : पुणे जिल्ह्यातील गुंजवणी धरण परिसरात अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून, दोन सख्ख्या शेतकरी भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
राजगड तालुक्यातील घेवंडे गावाजवळील गुंजवणी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये ही घटना घडली. दामाजी गायकवाड (वय ५०) आणि दत्तू गायकवाड (वय ५५) अशी मृत भावांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शेतीपंपाला पाणी कमी पडत असल्याने मोठे भाऊ पंप पाण्यात टाकत होते. त्यावेळी त्यांचा तोल जाऊन ते पाण्यात पडले. हे पाहताच लहान भावाने त्यांना वाचवण्यासाठी तात्काळ पाण्यात उडी मारली. मात्र दुर्दैवाने दोघांचाही बुडून मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. सुमारे ६ ते ७ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर दामाजी गायकवाड यांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. तर दुसऱ्या भावाचा मृतदेह शोधण्यासाठी स्कुबा पथकाच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू होती.
या घटनेमुळे संपूर्ण घेवंडे गावावर शोककळा पसरली आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, धरणातील पाणीपातळी घटल्यामुळे अनेक शेतकरी पंप पाण्यात टाकण्यासाठी थेट धरणात उतरतात. मात्र योग्य खबरदारी न घेतल्याने अशा दुर्घटना घडत असल्याचे त्यांनी सांगितले.
या हृदयद्रावक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


