Congress crisis : कर्नाटक मध्ये काँग्रेस पक्षात मोठ्या राजकीय हालचालींना वेग आला असून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची चर्चा रंगली आहे. तब्बल ३० आमदारांनी बंडखोर भूमिका घेत दिल्ली गाठल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना उधाण आले होते. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी काही गटांकडून होत होती. या पार्श्वभूमीवर आता आमदारांचा एक गट दिल्लीला रवाना झाला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, हे आमदार काँग्रेस हायकमांडशी चर्चा करून मंत्रिमंडळात फेरबदल आणि नेतृत्वाबाबत निर्णय घेण्याचा दबाव आणत आहेत. ते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
दरम्यान, काही आमदारांनी स्पष्ट केले आहे की, हे बंड नसून मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलासाठीचा दबाव आहे. यापूर्वी दिलेल्या आश्वासनानुसार सर्वांना संधी मिळावी, हीच त्यांची मुख्य मागणी असल्याचे सांगण्यात येत आहे.
तरीही, या हालचालीमागे नेतृत्व बदलाचा प्रयत्न असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे आता काँग्रेस हायकमांड काय निर्णय घेणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.


