इंदापूर : प्रतिनिधी
ज्यांचे विचार कधीही जुळले नाहीत, राजकारणात एकमेकांच्या विरोधात लढले ते फक्त सत्तेसाठी आणि एका व्यक्तीला पाडण्यासाठी एकत्र आलेले आहेत. इंदापूरकरांनो ही आघाडी विकासासाठी नाही, विकासासाठी सकारात्मक नवीन दृष्टी असणाऱ्या उमेदवारांच्या बाजूने कौल द्यावा असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
इंदापूर शहरातील बाबा चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्रीजित पवार मतदारांना मार्गदर्शन करत होते. सभेच्या वेळी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, पुणे जिल्हा बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे, राजेंद्र तांबिले यांच्यासह अनेक पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, इंदापूर शहरामध्ये वेगळी आघाडी पाहायला मिळत आहे. या आघाडीचे नाव कृष्णा भीमा विकास आघाडी आहे. कृष्णा म्हणत असेल माझे नाव कशाला घेतले तर भीमा म्हणत माझे नाव कशाला दिले. विकासचा शब्दाचा यांचा संबंध नाही. कृष्णा भीमा भकास आघाडी असे नाव आहे असे म्हणताच श्रोत्यांच्या मध्ये हशा पिकला.
अजित पवार पुढे म्हणाले, ज्यांचे विचार कधीही जुळले नाहीत, राजकारणात एकमेकांच्या विरोधात लढले ते फक्त सत्तेसाठी आणि एका व्यक्तीला पाडण्यासाठी एकत्र आलेले आहेत, इंदापूरकरांनो ही आघाडी विकासासाठी नाही, एकाच माळी मध्ये दोन टोकाचे मनी ओवले तर ती माळ टिकेल का ? असा प्रश्न लाडक्या बहिणींना करत पुढे म्हणाले, ही आघाडी कोणासाठी आहे. ही आघाडी जनतेच्या विकासासाठी नाही. ही आघाडी फक्त सत्तेसाठी आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सोबतीला इंदापूर शहरातील नगराध्यक्ष मिळाला तर पुढील काळात विकासासाठी जो निधी मिळेल तो कायमचा बंद होईल. ही धाकधूक त्यांना आहे. या भीतीपोटी तयार झालेली कृष्णा भीमा विकास आघाडी नाही, संधी साधू आघाडी आहे. त्यांना इंदापूर शहराच्या विकासाचे देणे घेणे नाही. समोरच्याा विरोधकांची वैयक्तिक द्वेषाची लढाई आहे. अशा नकारात्मक लोकांना पाठिंबा देवू नका. विकासासाठी नवीन दृष्टी घेऊन काम करणाऱ्या लोकांना सााथ द्या असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.


