Baramati News : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमुळे राज्यातील राजकारण तापले आहे. महायुतीकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करत असून या निमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन होणार आहे.
सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारी अर्जासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ उपस्थित राहणार आहेत. भुजबळ हे या निवडणुकीत स्टार प्रचारक म्हणूनही भूमिका बजावणार आहेत.
दरम्यान, महाविकास आघाडीत सुरुवातीला पेच निर्माण झाला होता. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सुनेत्रा पवारांविरुद्ध उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला, तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनेही निवडणूक न लढवण्याची भूमिका घेतली. मात्र काँग्रेसने अॅड. आकाश मोरे यांना उमेदवारी देत मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
आकाश मोरे हे माजी आमदार विजय मोरे यांचे पुत्र असून स्थानिक पातळीवर सक्रिय काँग्रेस कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. त्याचबरोबर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही निवडणुकीत उतरण्याचे संकेत दिले असून त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांच्या ट्वीटनेही चर्चांना उधाण आले आहे. त्यांनी बारामतीकरांना आवाहन करत, ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच जर निवडणूक झालीच, तर “अजितदादाच ही निवडणूक लढवत आहेत” असे समजून सुनेत्रा पवार यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करा, असे भावनिक आवाहन त्यांनी केले.
बारामती विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी मा. सुनेत्राकाकी आज उमेदवारी अर्ज दाखल करतायेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे, त्यामुळं उमेदवारी अर्ज भरणाऱ्या इतरांना आणि त्यांच्या पक्षालाही ही निवडणूक बिनविरोध करण्याची आमची विनंती आहे आणि ते मान्य… pic.twitter.com/wUXsMsQusF
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 6, 2026
दुसरीकडे विरोधकांनी हा प्रस्ताव फेटाळत लोकशाहीत निवडणूक लढवणे हा अधिकार असल्याचे स्पष्ट केले आहे. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी विरोधकांवर टीका करत, कोणीही समोर उभे राहिले तरी सुनेत्रा पवार विक्रमी मतांनी विजयी होतील, असा दावा केला.
तर काँग्रेस उमेदवार आकाश मोरे यांनीही लढतीचा निर्धार व्यक्त करत जनतेच्या प्रश्नांवर भर देणार असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार २३ एप्रिल रोजी मतदान होणार असून ४ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे बारामतीत आता थेट राजकीय लढत रंगणार हे स्पष्ट झाले आहे.


