पिंपरी: लग्नाचे आमिष दाखवून एका बबलीने भावी नवरदेवाला तब्बल एक कोटी 55 लाख 37 हजार रुपांचा गंडा घातला. या प्रकरणी शनिवारी (दि. 29) सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 45 वर्षीय व्यक्तीने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनामिका नाव सांगणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 17 फेब्रुवारी ते 28 नोव्हेंबर 2024 या कालावधीत घडली. अनामिका नाव सांगणाऱ्या महिलेने फिर्यादी व्यक्तीला लग्न करण्याचे आमिष दाखवले. त्यांचा विश्वास संपादन केला. भविष्यामध्ये घर खरेदी करण्यासाठी तसेच ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यासाठी महिलेने फिर्यादी यांच्याकडून वेगवेगळ्या बँक खात्यावर एक कोटी 55 लाख 37 हजार रुपये घेतले. त्यानंतर फिर्यादी यांच्याशी लग्न न करता तसेच त्यांचे पैसे परत न करता त्यांची फसवणूक केली. सायबर पोलीस तपास करीत आहेत.


