Maharashtra Weather Update : महाराष्ट्र राज्यात सध्या हवामानाचा अनोखा खेळ पाहायला मिळत आहे. एका बाजूला कडक ऊन आणि उष्णतेची लाट तर दुसऱ्या बाजूला अवकाळी पावसाचा इशारा दिल्याने नागरिकांसह शेतकरीही संभ्रमात आहेत.
हवामान विभागाने कोकण पट्ट्यात उष्ण आणि दमट हवामानाचा ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. मुंबईसह पालघर परिसरात प्रचंड उकाडा जाणवणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
तर दुसरीकडे सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
याशिवाय ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या भागांमध्ये उष्णतेची लाट कायम राहणार असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
एकीकडे उन्हाच्या झळा तर दुसरीकडे अवकाळी पावसाचा फटका यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे पुढील काही दिवस हवामानाचा हा बदलता पॅटर्न कायम राहण्याची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.


