Pune Accident : पुणे जिल्ह्यातील मंचरजवळ हृदय पिळवटून टाकणारी अपघाताची घटना समोर आली आहे. पुणे-नाशिक महामार्गावर एकलहरे परिसरात मध्यरात्री भरधाव कारने लक्झरी बसला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत कारचा अक्षरशः चुराडा झाला.
या अपघातात एकाच कुटुंबातील आई, वडील आणि आजी अशा तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन लहान मुलं गंभीर जखमी झाली आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की धडक इतकी जबरदस्त होती की कार पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी पोलिसांनी तात्काळ धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले आणि जखमींना रुग्णालयात दाखल केलं.
या अपघातामुळे पुणे-नाशिक महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी तातडीने वाहतूक सुरळीत केली असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे, एकलहरे परिसरात वारंवार अपघात होत असल्याने स्थानिकांनी सुरक्षिततेच्या उपाययोजनांची मागणी पुन्हा एकदा जोरात केली आहे.


