मुंबई: मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळ येत असताना, महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘ठाकरे वादळा’ची चाहूल लागली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही बंधूंच्या संभाव्य युतीची चर्चा सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात जोर धरत आहे. ही युती झाली, तर ती केवळ मुंबईपुरती मर्यादित न राहता राज्यातील आगामी राजकारणाचे गणित बदलू शकते, असे विश्लेषकांचे मत आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात अलीकडे झालेल्या सलग भेटींमुळे शिवसेना (उद्धव गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्यात राजकीय सेतू बांधला जातोय का, असा प्रश्न सर्वत्र विचारला जात आहे.
मुंबई महानगरपालिका (BMC) ही दोघांसाठी अस्तित्वाची लढाई मानली जात असल्याने या युतीला विशेष महत्त्व आहे. या पार्श्वभूमीवर ‘ब्रँड ठाकरे’ पुन्हा एकत्र आला, तर तो भाजपच्या विजयरथाला अडथळा ठरू शकतो, असा अंदाज वर्तविला जात आहे.
सर्वेक्षणात धक्कादायक आकडे
एका कॉर्पोरेट सर्व्हे संस्थेने भाजपसाठी केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणात उघड झाले आहे की, उद्धव-राज ठाकरे जर एकत्र लढले, तर त्यांना एकूण मतांपैकी तब्बल 52 टक्के मतांचा लाभ होऊ शकतो. राजकीय विश्लेषक रोहित चंदावरकर यांनी सांगितले की, या आकडेवारीने भाजप आणि महायुती दोघांच्या गोटात खळबळ उडवली आहे. ज्या मुंबईत भाजप ‘महापौर’ बसवण्याचा निर्धार करत आहे, तिथे ठाकरे युती झाल्यास भाजपचा विजय फार अवघड ठरू शकतो.
ठाकरे युतीचा संभाव्य प्रभाव
मुंबई महानगरपालिकेतील 227 वॉर्डपैकी तब्बल 90 वॉर्डमध्ये मनसेची मतं निर्णायक ठरू शकतात. विधानसभा निवडणुकीच्या आकडेवारीनुसार, अनेक ठिकाणी मनसे उमेदवारांना विजयी उमेदवारांच्या मताधिक्यापेक्षा जास्त मतं मिळाली होती. वरळी, दादर, माहीम, घाटकोपर, विक्रोळी, मालाड आणि दिंडोशी या भागांमध्ये मनसेचा प्रभाव अद्याप ठळक आहे. या भागांतील मतदारवर्ग ठाकरे नावाशी निष्ठावान असल्याने, जर दोघे एकत्र आले, तर मराठी मतं प्रचंड प्रमाणात ठाकरे गटाकडे वळण्याची शक्यता आहे.
भाजपसाठी आव्हान की रणनीतीचा नवा टप्पा?
भाजपकडे सत्तेचा आणि विकास योजनांचा मोठा फायदा असला तरी, ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने मुंबईतील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलू शकतात. या संभाव्य युतीमुळे भाजपकडून पुन्हा राज ठाकरे यांना जवळ घेण्याचे प्रयत्न सुरू होतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


