KDMC Election 2026: राज्यातील महानगरपालिका निवडणुकीत मतदानाचा अधिकृत टप्पा गाठण्यापूर्वीच महायुतीने मोठी आघाडी घेतली आहे. कल्याण-डोंबिवली (KDMC) महानगरपालिकेत भाजप-शिवसेना युतीचे तब्बल 9 उमेदवार बिनविरोध निवडून आले असून, यामुळे महायुतीच्या गोटात प्रचंड जल्लोष पाहायला मिळत आहे. केवळ कल्याणमध्येच नव्हे, तर राज्यभरात महायुतीने 15 जागांवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
केडीएमसीमध्ये युतीची सरशी
कल्याण-डोंबिवलीच्या 122 जागांपैकी 9 जागा आधीच खिशात टाकल्याने महायुतीने सत्तेच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले आहे. आता बहुमतासाठी (62 जागा) त्यांना केवळ 53 जागांची आवश्यकता आहे. भाजपच्या ५ उमेदवारांचा विजय झाला. रेखा चौधरी, आसावरी नवरे, रंजना पेणकर, मंदा पाटील आणि ज्योती पवन पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची रणनीती येथे यशस्वी ठरली. तथापी, शिंदे सेनेचे ४ उमेदवार विजयी झाले आहेत. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वात रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली जोशी आणि हर्षल राजेश मोरे (आमदार राजेश मोरे यांचे चिरंजीव) यांनी बाजी मारली आहे.
हेही वाचा – Kalyan Dombivli Election : मतदानाआधीच शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपचा पहिला विजय; कोण आहे तो नगरसेवक?
भिवंडीत २४ वर्षांनंतर इतिहास
दरम्यान, भिवंडी महापालिकेत भाजपने विजयाचे खाते उघडले असून माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे पुतणे सुमित पुरुषोत्तम पाटील बिनविरोध निवडून आले आहेत. गेल्या २४ वर्षांतील भिवंडीच्या निवडणूक इतिहासात बिनविरोध निवडून येणारे सुमित पाटील हे पहिले उमेदवार ठरले आहेत. या ऐतिहासिक यशाबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून त्यांचे अभिनंदन केले.
रणनीतीचा विजय
राज्यात भाजपचे 9, शिवसेनेचे 5 आणि राष्ट्रवादीचा 1 असे एकूण 15 उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने महायुतीने विरोधकांवर मोठी आघाडी घेतली आहे. अनेक ठिकाणी अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्याने महायुतीचा मार्ग सुकर झाला असून, हा विजय आगामी मुख्य मतदानासाठी ‘बूस्टर डोस’ मानला जात आहे.


