Theft at Santosh Deshmukh House: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी बीडमधील अनेक सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. हे हत्याकांड संपूर्ण देशात गाजले होते. संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी अनेक ठिकाणी लोक रस्त्यावरही उतरले होते. अशातच आता पुन्हा एकदा मस्साजोग चर्चेत आले आहे. मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्यासह गावातील अनेकांच्या घरी घरफोडी झाल्याचे समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या घरी घरफोडी
बीडच्या मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या घरी मध्यरात्री घरफोडी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. रात्री घरात दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख, पत्नी अश्विनी देशमुख, आई आणि कुटुंबातील सर्व सदस्य झोपलेले असताना हा प्रकार घडला आहे. सकाळी उठल्यानंतर हा संपूर्ण प्रकार लक्षात आला. यानंतर याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली असून मस्साजोगमध्ये केज पोलिसांसह बीड स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि फॉरेन्सिक टीम देखील दाखल झाली असून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे.
कॉपर केबल चोरून नेले
समोर आलेल्या माहितीनुसार मस्साजोग गावात मध्यरात्री चोरट्यांनी धनंजय देशमुख यांच्या घरासह अनेक ठिकाणी घरफोडी केली तर तलावाच्या परिसरात असलेले कॉपर केबल चोरून नेले आहे. या प्रकरणाचा पोलिसांकडून वेगाने तपास सुरू करण्यात आला आहे. केज पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक, श्वानपथक आणि फॉरेन्सिक टीम देखील मस्साजोग परिसरात दाखल झाली असून तपास सुरू करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
चोरीच्या या घटनेबाबत बोलताना धनंजय देशमुख यांनी सांगितले की, गावातील 7 ते 8 ठिकाणी घरफोडी झाली. आमच्या घरातून किमती साहित्य चोरीला गेलेले नाही. मात्र इतरांच्या घरातून सोनं, रोख रक्कम चोरीला गेली आहे तर अनेक शेतकऱ्यांचे कॉपर केबल चोरीला गेले आहे ज्याची किंमत 7 लाखांपर्यंत आहे अशी माहिती धनंजय देशमुख यांनी दिली आहे. आता या प्रकरणाचा तपास वेगाने सुरु करण्यात आला आहे.


