मुंबई: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मराठवाड्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली आणि शेतकऱ्यांना त्वरित मदत करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. ठाकरे यांनी सरकारकडे मागणी केली की, पीएम केअर फंडातून मदत करून शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी कर्जमुक्त केले जावे. त्यांनी म्हटलं की, जर सरकार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देत नसेल, तर शिवसेना शेतकऱ्यांसोबत उभी राहणार आहे.
पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, आज सकाळपासून ते मराठवाड्यातील आपत्तीग्रस्त भागात धावत्या भेटी देत आहेत. त्यांचा हेतू फक्त जनतेला दिलासा देणे आहे, राजकारण करणं नाही. सरकारकडून दिलेली मदत तूटपुंजी असेल, तर ती स्वीकारता येणार नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. काही शेतकऱ्यांच्या मते, मराठवाड्यातील पूरामुळे त्यांच्या जीवनावर प्रचंड परिणाम झाला आहे. जमीन वाहून गेली, पीक सडली असून घरं आणि जनावरही पाण्यात वाहून गेले. सरकारकडून मिळणारी मदत तुटपुंजी असून, प्रत्यक्ष नुकसान भरपाईसाठी दुप्पट रक्कम लागेल, असे ठाकरे यांनी सांगितले.
बळीराजाचा हा आक्रोश सरकारपर्यंत कधी पोहोचणार? pic.twitter.com/I6wzZMnQ6P
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) September 25, 2025
हेही वाचा – शेतकऱ्यांसाठी 1,339 कोटींचे मदत पॅकेज जाहीर! दिवाळीपूर्वी मिळणार मदत; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
पंजाबसारखी मदत करण्याची मागणी
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी पुढे म्हटले की, पंजाबमध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही अशीच मदत मिळावी. सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती करावी किंवा हेक्टरी 50 हजार रुपये द्यावेत.


