अमरावती : जिल्ह्यातील अप्परवर्धा या सर्वात मोठ्या प्रकल्पासह ५५ सिंचन प्रकल्पांत ४४.२६ टक्के जलसाठा संचयित आहे. अप्परवर्धा धरण ४८.६२ टक्के भरले असून जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरू झालेल्या संततधार पावसामुळे प्रकल्पांत ६ टक्के जलसाठा वाढला. दरम्यान मंगळवारी जिल्ह्यात कुठे धुवांधार तर कुठे रिमझिम पाऊस सुरू आहे.
गतवर्षी जिल्ह्यात झालेल्या संततधार तसेच प्रकल्प क्षेत्रातील पावसामुळे १ मोठा प्रकल्प, ७ मध्यम आणि ४८ लघू अशा ५६ प्रकल्पांतील जलसाठ्यात वाढ झाली. यंदा उन्हाळ्याची तीव्रता वाढली आणि ५६ प्रकल्पांचा जलसाठा कमी होत गेला. ४८पैकी २७ लघु प्रकल्प कोरडे पडले होते. गेल्या काही दिवसात झालेल्या पावसाच्या पाण्यामुळे जलसाठ्यात वाढ झाली आहे.
जिल्ह्यातील सर्व ५६ प्रकल्पांमध्ये आजघडीला ४४.२६ टक्के जलसाठा आहे. यामध्ये जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या अप्परवर्धा धरणाचा जलसाठा २७४.२६ दलघमी म्हणजेच ४८.६२ टक्के आहे. तसेच सात मध्यम प्रकल्पात (१०१.६५ दलघमी) ३९.६७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. तसेच ४८ प्रकल्पांत (८७.५८ दलघमी) ३८.५८ टक्के जलसाठा आहे. मागील आठवड्यात ४३ टक्केवर असलेला जलसाठा पावसाने उसंत दिल्याने केवळ १ टक्क्यांनी वाढला आहे.


