HSC Result : भंडारा जिल्ह्यात बारावीच्या निकालानंतर दुर्दैवी घटना घडली आहे. परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याचे समजल्यानंतर १८ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना तुमसर तालुक्यातील रोंघा येथे घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नावेद होलाराम खंडाते असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याने यंदा महाराष्ट्र बोर्डाची बारावीची परीक्षा दिली होती. निकाल जाहीर झाल्यानंतर आपण नापास झाल्याचे समजताच तो मानसिक तणावात गेला होता.
शनिवारी दुपारी त्याने गावाजवळील शेतात जाऊन गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे.
दरम्यान, राज्याचा बारावीचा निकाल यंदा ८९.७९ टक्के लागला असून मुलींनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे.
याच निकालात भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनीही उल्लेखनीय यश संपादन केले. नूतन कन्या ज्युनिअर कॉलेजची गीतिका श्याम धूत हिने १०० टक्के गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.


