Hingoli earthquake : हिंगोली जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पांगरा शिंदे गावासह आसपासच्या परिसराला हा भूकंपाचा धक्का बसल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, गेल्या दोन महिन्यांत चौथ्यांदा भूकंप झाल्याने स्थानिकांची चिंता वाढली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पांगरा, बोल्डा आणि बोल्डावाडी परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता कमी असल्याने कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती नाही. मात्र वारंवार होत असलेल्या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि संबंधित यंत्रणा सतर्क झाल्या असून भूमापक केंद्राकडून भूकंपाची नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता घाबरून जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, दोन महिन्यांत चार वेळा भूकंपाचे धक्के बसल्याने या परिसरातील भूकंपीय हालचालींबाबत तज्ज्ञांकडून बारकाईने निरीक्षण केले जात आहे.


