Amravati Accident : अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर-मुर्तिजापूर रोडवर रविवारी संध्याकाळी भरधाव कारने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दोन बांधकाम मजुरांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये गौतम अणा मोहोड आणि कैलास एकनाथ पेठकर यांचा समावेश आहे. दोघेही दर्यापूर येथून काम आटोपून घरी परतत होते.
माहितीनुसार, दुचाकीवर स्वार असलेले मोहोड आणि पेठकर हे दुसऱ्या गावात बांधकामावर मजुरी करत होते. संध्याकाळी घरी जाताना समोरून येणाऱ्या कारने त्यांच्या दुचाकीला उडवले. धडकेमुळे दोघांना डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि जागीच मृत्यू ओढवला. अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा पूर्ण चुराडा झाला, तर कारच्या समोरील भागाचेही मोठे नुकसान झाले.
अपघाताची माहिती मिळताच दर्यापूर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवले. अपघातग्रस्त कार आणि दुचाकी ताब्यात घेण्यात आली आहे. घटनेची नोंद करून गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार कारचालकाचा शोध सुरू आहे.
या घटनेने मोहोड आणि पेठकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांकडून तपास सुरू असून, अपघाताच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.


