Yavatmal Election Result 2025 : महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायती निवडणुकांमध्ये महायुतीचा जल्लोष सुरू असतानाच, यवतमाळ जिल्ह्यातील नेर नगरपंचायतीत अपक्ष उमेदवार सचिन उर्फ जांभा कैलास कराळे यांनी सर्व समीकरणे उधळून लावली. कोणताही राजकीय वारसा, पक्षाचे पाठबळ किंवा आर्थिक बळ नसतानाही त्यांनी लोकवर्गणीतून निवडणूक लढली आणि दणदणीत विजय मिळवला. हा विजय शिवसेना (शिंदे गट)चे माजी मंत्री संजय राठोड यांच्या प्रभावक्षेत्रात आल्याने त्याचे विशेष कौतुक होत आहे.
जांभा कराळे यांची पार्श्वभूमी सामान्य आहे. आर्थिक परिस्थिती बेताची, स्वतःचे हक्काचे घरही नाही. तरीही त्यांनी जनतेच्या कामाच्या जोरावर आणि लोकवर्गणीच्या मदतीने प्रचार केला. नेरच्या मतदारांनी पारंपरिक राजकारणाला छेद देत जांभावर विश्वास टाकला आणि त्यांना विजयी केले. हा निकाल लोकशाहीची खरी ताकद अधोरेखित करतो आणि नव्या तरुणांना राजकारणात उतरण्यासाठी प्रेरणा देतो.
प्रियदर्शनी उईके यांचा मोठा विजय
यवतमाळ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपाच्या ऍड. प्रियदर्शनी उईके यांनी काँग्रेसच्या प्रियंका मोघे यांच्यावर मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. प्रियदर्शनी या राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांची कन्या आहेत. त्यांनी ५७,७१३ मते मिळवली, तर प्रियंका मोघे यांना ४४,९९४ मते मिळाली. प्रियदर्शनी यांनी १२,७१९ मतांच्या फरकाने बाजी मारली.
विजयानंतर प्रियदर्शनी उईके म्हणाल्या, “हा विजय माझा वैयक्तिक नसून संपूर्ण यवतमाळकरांचा आहे. विकासकामे आणि जनतेच्या आशीर्वादाने हा कौल मिळाला.”


