Kolhapur double murder Case : कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी शहराला हादरवून टाकणारी मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. हुपरीतील सूर्या कॉलनी परिसरात राहणाऱ्या वृद्ध दांपत्याची त्यांच्याच मुलाने क्रूरपणे हत्या केली. हत्येनंतर आरोपी मुलगा शांतपणे स्वतः हुपरी पोलीस ठाण्यात हजर झाला आणि गुन्ह्याची कबुली दिली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, हत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मृतांची नावे विजयमाला नारायण भोसले (वय ६५) आणि नारायण गणपतराव भोसले (वय ७५) अशी आहेत. तर आरोपी त्यांचा मुलगा सुनील नारायण भोसले (वय ४५-४८) आहे. शुक्रवारी पहाटे सुमारे ५ वाजता ही भयानक घटना घडली. प्राथमिक तपासात समोर आले की, सुनीलने धारधार काचेच्या तुकड्याने आईच्या हाताच्या नसा कापल्या आणि चेहऱ्यावर वार केले. तर वडिलांच्या डोक्यात काठीने जोरदार प्रहार केले. या हल्ल्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
हत्येनंतर सुनील थेट पोलीस ठाण्यात जाऊन हजर झाला आणि गुन्ह्याची कबुली दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक एन. आर. चौखंडे यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक टीमने पुरावे गोळा केले असून, पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. पोलिसांकडून सुनीलचा जबाब नोंदवला जात असून, हत्येमागचे कारण शोधण्यासाठी सखोल तपास सुरू आहे. घरगुती वाद किंवा इतर कोणते कारण असू शकते, याचा शोध घेतला जात आहे.
ही घटना रक्ताच्या नात्यातील विश्वासाला काळिमा फासणारी असून, परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला गती दिली आहे.


