Balasaheb Sarwade murder case: मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणातील तीन आरोपींना 4 दिवसांची तर एका आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. भाजपच्या उमेदवार शालन शिंदे यांना 2 दिवसांची तर आतिश शिंदे, अमर शिंदे, तानाजी शिंदे या तीन आरोपींना 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज माघार घेण्यावरुन सोलापुरातील जोशी गल्ली येथे भाजपचे दोन गटात मोठा वाद झाला होता. शिंदे आणि सरवदे कुटुंबात झालेल्या वादात मनसेचे पदाधिकारी असलेल्या बाळासाहेब सरवदे यांची हत्या झाली होती.
बाळासाहेब सरवदे हत्या प्रकारणी सोलापूरच्या जेलरोड पोलीस ठाण्यात 15 आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. भाजप उमेदवार शालन शिंदे यांच्यासह 4 जणांना पोलिसांनी तात्काळ अटक केली होती. आज सोलापुरातील प्रथम वर्ग न्यायदांडाधिकारी श्रीमती एम. पी. मर्ढेकर यांच्या न्यायालयात हजर केलं असता पुढील तपासासाठी पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे खून प्रकरणात भाजप आमदार विजयकुमार देशमुख आणि त्यांचा मुलगा डॉ. किरण देशमुख यांच्यावर गभीर आरोप केले जात आहेत. मनसे नेते प्रशांत इंगळे आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते व माजी आमदार नरसय्या आडम यांनी थेट आरोप केले आहे
विविध कलमान्वये गुन्हे दाखल
सोलापुरात राजकीय वादातून झालेल्या मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे हत्याप्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविका आणि प्रभाग 2 च्या उमेदवारासह 15 जणावर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. भाजपच्या माजी नगरसेविका, प्रभाग 2 मधील उमेदवार शालन शिंदे, तीचा पती शंकर शिंदे यांच्यासह 15 जणावर हत्येचा गुन्हा पोलिसांनी नोंद केलाय. काल (शुक्रवारी) उमेदवारी अर्ज माघार घेण्यावरून भाजप उमेदवार शालन शिंदे आणि भाजपच्या बंडखोर रेखा सरवदे यांच्या कुटुंबियांत वाद झाला होता.
दरम्यान, भाजप उमेदवार शालन शंकर शिंदे यांनी मयत बाळासाहेब सरवदे याच्या डोळ्यात चटणी टाकून इतर आरोपीनी त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आलंय. मयत बाळासाहेब याचा भाऊ बाजीराव पांडुरंग सरवदे याच्या फिर्यादीवरून एकूण 15 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीएनएस कलम 103, 109, 189 (1),(2), 190, 191(2),(3), 49, 352, 351(2), शस्त्र अधिनियम 4, 25 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


