सातारा : महाराष्ट्राच्या राजकारणात सातारा जिल्ह्यात मोठी उलथापालथ घडली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या जवळच्या सहकाऱ्याने जोरदार धक्का दिला. शिंदे यांची मानली जाणारी बहीण आणि माजी नगरसेविका विमल ओंबळे यांनी पक्ष सोडून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामुळे साताऱ्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीची स्थिती मजबूत झाली आहे.
सातारा दौऱ्यानंतर शिंदे यांनी विमल ओंबळे यांची जबाबदारी स्थानिक नेते कुमार शिंदे यांच्याकडे सोपवली होती. मात्र, दोन दिवसांपूर्वी कुमार शिंदे यांनी अचानक पाठिंबा काढून घेतला आणि विमल ओंबळे यांच्या प्रतिस्पर्धी विमल बिरामणे यांना साथ दिली. याची तक्रार विमल ओंबळे यांनी शिंदे यांच्याकडे केली, पण सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने त्या नाराज झाल्या. अखेर मंत्री मकरंद पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला आणि उमेदवारी अर्ज मागे घेतला.
साताऱ्यात नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीने सुनील शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. तिकीट न मिळाल्याने नासिर मुलाणी यांनी बंडखोरी केली होती, पण मकरंद पाटील यांनी समजूत काढल्याने त्यांनी अर्ज मागे घेतला. यामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह शमला. सुरुवातीला ७ उमेदवार रिंगणात होते, पण राष्ट्रवादीचे नासिर मुलाणी आणि शिवसेना (ठाकरे गट) चे राजेश कुंभारदरे यांनी अर्ज मागे घेतल्याने आता फक्त ५ उमेदवार शिल्लक आहेत. यात तिरंगी लढत अपेक्षित आहे.
नगरसेवकांच्या २० जागांसाठी सुरुवातीला ८३ उमेदवारांनी ११४ अर्ज दाखल केले होते. त्यातील २० अर्ज मागे घेण्यात आल्याने आता ६३ उमेदवार निवडणुकीत उतरले आहेत. साताऱ्यातील हे राजकीय नाट्य कोणाच्या बाजूने जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


