Pune PMC : पुणे महानगर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत जाहिरात फलक धोरणावरून जोरदार वाद निर्माण झाला. स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भीमाले आणि अतिरिक्त आयुक्त प्राजीत नाय यांच्यातील मतभेदामुळे सभागृहात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
महापालिकेच्या आकाश चिन्ह विभागाने शहरातील सार्वजनिक ठिकाणी सुमारे ४ हजारांहून अधिक जाहिरात फलक उभारण्याचे धोरण तयार केले आहे. या प्रकल्पातून तब्बल १७०० कोटी रुपयांची उलाढाल अपेक्षित असून, संबंधित कंपन्यांकडून महापालिकेला ३० टक्के महसूल मिळणार आहे.
मात्र, अतिरिक्त आयुक्त प्राजीत नायर यांनी या उत्पन्नाचे गणित जीएसटीच्या आधारे निश्चित करण्याची मागणी केली. त्यामुळे व्यवहारात पारदर्शकता राहील आणि महापालिकेचे संभाव्य नुकसान टाळता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी श्रीनाथ भीमाले यांनी प्रस्ताव तात्काळ मंजूर करण्याचा आग्रह धरला. मात्र, नायर यांनी त्यास विरोध केल्यानंतर वाद चिघळला. बैठकीदरम्यान “बैठकीत बघून घेतो” अशी धमकी दिल्याचा आरोप भीमाले यांच्यावर करण्यात आला आहे.
या प्रकरणामुळे आयुक्त नवल किशोर राम नाराज झाल्याची माहिती समोर आली आहे. वाद वाढत असल्याने काही नगरसेवकांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. महापौर मंजूषा नागपुरे यांनीही सभागृहनेते गणेश बिडकर यांना बोलावून हा वाद शांत करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, श्रीनाथ भीमाले यांनी सर्व आरोप फेटाळून लावत कोणतीही धमकी दिली नसल्याचे सांगितले आहे. “माझ्याविरोधात खोटी माहिती पसरवली जात आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
या धोरणानुसार शहरातील उड्डाणपूल, भुयारी मार्ग, विद्युत खांब आणि इतर सार्वजनिक ठिकाणी एकूण ४,२२४ जाहिरात फलक उभारले जाणार आहेत. या माध्यमातून सुमारे २.७१ लाख चौरस फुटांचे जाहिरात क्षेत्र उपलब्ध होणार असून, प्रस्तावाला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर महापालिकेच्या उत्पन्नात मोठी वाढ अपेक्षित आहे.


