करमाळा: तपासीय अंमलदाराने गुन्ह्यातील घटनेच्या वेळी आरोपी घटनास्थळावर होता की नाही, याबाबतचा पुरावा निष्पन्न न करता त्याचे नाव दोषारोप पत्रातून वगळले. तसेच उपविभागीय पोलिस अधिकाऱ्याच्या बनावट सहीचे दोषारोप मंजुरीचे पत्र तयार करून आरोपीला तपासात सहकार्य केल्याच्या आरोपावरून करमाळा पोलीस स्टेशनच्या तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस शिपाई गणेश महादेव शिंदे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.
करमाळा पोलिसांत दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासामध्ये तपासीय अंमलदार सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय जाधव यांनी गुन्ह्यातील आरोपी सुहास रामचंद्र साळुंखे यास गुन्ह्याच्या दोषारोपातून वगळून आरोपपत्र दाखल केले. तसेच त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, टेंभूर्णी येथे उपचार घेतल्याच्या माहितीत तफावत दिसून आली.
यासोबतच उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या सहीचे बनावट दोषारोपपत्र मंजुरीचे पत्र तयार करुन ते करमाळा पोलिसांत सादर केले आणि दोषारोप नंबर घेऊन ते उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय न्यायालयात दाखल केले. यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय जाधव (सध्या नेमणूक अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे) यांनी गुन्ह्याच्या तपासात सहकार्य केल्याचे दिसून आल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स.पो.नि. पी. बी. टिळेकर तपास करत आहेत.


