पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे गुरव परिसरात गुईलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या आजारामुळे एका ३६ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. ‘जीबीएसची लागण झाल्यानंतर या रुग्णाला न्यूमोनियाचीदेखील लागण झाली होती. पिंपळेगुरव परिसरात वास्तव्यास असलेल्या ३६ वर्षीय युवकाला २१ जानेवारी रोजी जीबीएस या आजाराची लागण झाली होती. त्याच्यावर महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू होते. या रूग्णाला गुईलेन जीबीएसनंतर न्यूमोनियाचीही लागण झाली होती. ३० जानेवारी रोजी उपचारादरम्यान सदर रुग्णाचा मृत्यू झाला आहे. युवकाचा मृत्यू नेमका कोणत्या आजारामुळे झाला, उपचारात हयगय झाली का, याची चौकशी करण्यासाठी वायसीएमने एक समिती देखील स्थापन केली होती.
गुईलेन बॅरे सिंड्रोमनंतर रुग्णाला न्यूमोनिया झाला होता. न्यूमोनियामुळे त्याच्या श्वसनसंस्थेवर आघात झाल्याने त्याला श्वास घेण्यास त्रास झाल्याने आणि जीबीएस या आजाराने मृत्यू झाल्याची कारणे समितीने दिली आहेत. पिंपरी चिंचवड शहरात आजपर्यंत १३ रुग्ण गुईलेन बॅरे सिंड्रोम या आजाराचे आढळले होते. त्यापैकी काही रुग्ण बरे झाले आहेत. तर, काहींवर उपचार देखील सुरू आहेत.
महापालिकेकडून हेल्पलाईन सुरू
गुईलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या आजाराची योग्य माहिती नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी, नागरिकांच्या शंकेचे निरसन व्हावे, यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने हेल्पलाईन सुरू केली आहे. हेल्पलाईन २४ तास सुरू असून तज्ञ वैद्यकीय अधिकारी २४ तास उपलब्ध असतील. सदर आजाराबाबत चौकशी करण्याकरिता नागरिकांनी ७७५८९३३०१७ या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.


