सांगली : जिल्ह्यातील ईश्वरपूर येथे एका कंपनीच्या सेप्टिक टँकची सफाई करताना मोठी दुर्घटना घडली. विषारी वायूच्या प्रभावाने तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला, तर त्यांना वाचवण्यासाठी उतरलेल्या पाच जणांची प्रकृती गंभीर झाली आहे. गंभीर जखमींवर कोल्हापूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून कामगार वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही घटना काल सायंकाळी घडली आहे. सेप्टिक टँक साफ करण्यासाठी सर्वप्रथम सुभाष जाधव टँकमध्ये उतरले. मात्र, टँकमधील विषारी वायूमुळे त्यांना चक्कर येऊन ते आतच कोसळले. त्यांना पाहून सचिन तानाजी जाधव यांनी मदतीसाठी टँकमध्ये उडी घेतली, पण त्यांनाही गुदमरल्याने बेशुद्धावस्था आली. त्यानंतर कंपनीतील सहकारी रंगराव माळी यांनी धाव घेतली आणि तेही टँकमध्ये अडकले.
या तिघांना बाहेर काढून तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न झाला, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. मदत करण्यासाठी उतरलेले इतर कामगारही विषारी वायूच्या संपर्कात आल्याने गंभीर झाले. यातील काही जणांना पुढील उपचारासाठी कोल्हापूरला हलवण्यात आले आहे.
ही घटना पुन्हा एकदा सेप्टिक टँक सफाईतील सुरक्षेच्या उपाययोजनांच्या अभावाकडे लक्ष वेधते. अशा कामात योग्य सुरक्षा साधने आणि प्रशिक्षण नसल्याने असे अपघात वारंवार घडतात. स्थानिकांनी कंपनी व्यवस्थापनावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. पोलिसांनी घटनेची नोंद घेऊन तपास सुरू केला आहे.


