करमाळा: श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीसाठी जेऊर ऊस उत्पादक गटामधून माजी संचालक विलासराव पाटील यांचे नातू प्रशांत पाटील यांनी आज (दि. १७) जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी पाटील यांना सभासदांकडून जोरदार प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. कारखाना निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. निवडणुकीसाठी सर्वच गट मक्रिय झाले असून आलेल्या मोठ्या प्रमाणात अर्जावरून निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर झाली आहे.
विविध गटांतून २१ जणांची होणार निवड
जेऊर, सालसे, पोमलवाडी, केम, रावगाव अशा पाच ऊस उत्पादक सभासद गटांतून प्रत्येकी ३ प्रमाणे एकूण १५ प्रतिनिधी तर उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था प्रतिनिधी- १, अनु. जाती/अनु. जमाती प्रतिनिधी (१), महिला राखीव प्रतिनिधी (२), इतर मागासवर्गीय जाती प्रतिनिधी (१) व भटक्या वि. जाती व जमाती विशेष मागास प्रवर्ग (१) अशा एकूण ६ मतदार संघांतून एकूण २१ प्रतिनिधी या प्रक्रियेद्वारे निवडण्यात येणार आहेत. १७ एप्रिल २५ रोजी सकाळी ८ ते सायं. ५ पर्यंत श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळासाठी मतदान घेण्यात येणार असून १९ एप्रिल २५ रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीनंतर लगेचच निकाल जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा शिल्पा ठोकडे यांनी दिली आहे.
४ एप्रिल रोजी अंतिम यादी प्रसिद्ध होणार
१७ मार्च रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत तहसील कार्यालय येथे नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहेत. १८ मार्च रोजी छाननी प्रक्रिया होणार आहे. १९ मार्च रोजी सकाळी ११ वाजता विधी ग्राह्य नामनिर्देशन पत्रांची सूची प्रसिद्ध करण्यात येणार आहे. १९ मार्च ते २ एप्रिल पर्यंत अर्ज मागे घेता येणार असून ४ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता अंतिम विधी ग्राह्य नामनिर्देशन पत्रांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.


