Uddhav Thackeray Shivsena : सोलापूरमधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या शहर उत्तर-मध्य विधानसभा आढावा बैठकीत सोमवारी प्रचंड गोंधळ उडाला. संतप्त शिवसैनिकांनी संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांच्यावर ‘गद्दारांवर कारवाई कधी करणार?’ असा थेट जाब विचारत धावून गेल्याने एकच खळबळ उडाली.
‘कारवाई करणार नसाल तर पक्षाचे कामकाज बंद ठेवू’, असा निर्वाणीचा इशारा देत शिवसैनिकांनी कोकीळ यांना घेरले. या घटनेमुळे ठाकरे गटातील अंतर्गत कलह अधिक उफाळून आला असून, निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाची ठिणगी पेटली आहे.
माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासमोरच उडाला गोंधळ
ही बैठक पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे, उपनेत्या अस्मिता गायकवाड, जिल्हाप्रमुख अजय दासरी, शहरप्रमुख महेश धाराशिवकर, उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय गणेशकर, प्रताप चव्हाण आणि महिला आघाडीच्या शहर संघटिका अमिता जगदाळे यांच्या उपस्थितीत सुरू होती. मात्र, अचानक शिवसैनिकांनी संपर्कप्रमुख कोकीळ यांना लक्ष्य केल्याने सभा थंडावली.
निष्ठावान शिवसैनिकांच्या या आक्रमक भूमिकेमुळे सोलापूर शहरातील ठाकरे गटाचे अंतर्गत राजकारण ढवळून निघाले आहे. गद्दारांवर पक्षश्रेष्ठींकडून कारवाई होण्यास उशीर होत असल्याचा संताप शिवसैनिकांमध्ये आधीपासून होता, तर कोकीळ यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याची भावना पसरली होती.
बैठकीत घडले नेमके काय?
शिवसैनिकांनी स्पष्ट केले की, पक्षविरोधी काम करणाऱ्या ‘गद्दारां’वर कारवाई करण्यात चालढकल होत असल्याचा आरोप कोकीळ यांच्यावर केला. ‘पक्षाच्या प्रतिमेला धक्का लागू नये म्हणून शांत राहतो, पण नेते मुंबईला गेल्यावर सर्व काही विसरतात’, असा थेट आरोप करत त्यांनी कोकीळ यांना घेरले.
कोकीळ यांनी ‘या विषयावर वेगळी बैठक घेऊ’ असे सांगितले तरी शिवसैनिक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. संतापलेल्या कार्यकर्त्यांनी ‘कारवाई करा, नाहीतर संपर्कप्रमुख हटाव’ असा जोरदार नारा दिला. काही विशिष्ट पदाधिकाऱ्यांकडून निष्ठावान शिवसैनिकांना दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचेही त्यांनी वरिष्ठ नेत्यांसमोर मांडले.


