Ahilyanagar: महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) चे दोन उमेदवार (MNS Candidates) गेल्या 24 तासांपासून बेपत्ता झाले आहेत. या उमेदवारांचा त्यांच्या कुटुंबीयांशी किंवा पक्षाशी कोणताही संपर्क झालेला नाही, त्यामुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
निवडणूक बिनविरोध होण्यासाठी दबाव
मनसे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ आणि विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी ही माहिती दिली. त्यांच्या मते, निवडणुकीच्या तोंडावर अशी घटना घडणे संशयास्पद आहे. विशेषतः केडगाव भाग हा राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानला जातो. या भागात निवडणूक बिनविरोध होण्यासाठी दबाव टाकला जात असावा आणि त्याच पार्श्वभूमीवर हे अपहरण घडले असावे, असा गंभीर आरोप सुमित वर्मा यांनी केला आहे.
राजकीय षड्यंत्र
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा घटना राजकीय षड्यंत्राची द्योतक असल्याचे बोलले जात आहे. मनसे नेत्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याची तयारी सुरू केली असून, लवकरात लवकर उमेदवारांचा शोध घेऊन त्यांना सुखरूप बाहेर काढावे, अशी मागणी केली आहे. या प्रकरणामुळे अहिल्यानगरातील निवडणूक वातावरण अधिक तंग झाले असून, राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.


