Uddhav Kamble : महानगरपालिका निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पुण्यात जो राडा झाला, त्याची चर्चा आता संपूर्ण राज्यभर रंगली आहे. प्रभाग क्रमांक 36 मध्ये शिवसेना (शिंदे गट) अंतर्गत उमेदवारीवरून सुरू असलेल्या वादाने हिंसक वळण घेतले. पक्षाचा अधिकृत उमेदवार ठरवण्यासाठी सुरू असलेल्या संघर्षात उद्धव कांबळे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा ‘एबी’ फॉर्म चक्क निवडणूक अधिकाऱ्यांच्या समोरच फाडून टाकला.
‘फॉर्म खाल्ला’ की फक्त ‘फाडला’?
सुरुवातीला उद्धव कांबळे यांनी हा अर्ज फाडून चक्क गिळून टाकल्याच्या बातम्यांमुळे खळबळ उडाली होती. मात्र, पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर कांबळे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात हजर होऊन आपली बाजू मांडली. मी भावनेच्या भरात अर्ज फाडला हे मान्य आहे, पण मी तो खाल्लेला नाही. माध्यमांतील ‘फॉर्म गिळल्याच्या’ बातम्यांमध्ये तथ्य नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
हेही वाचा – पुणे महापालिकेत भाजपला बंडखोरीचा मोठा फटका; ४२ विद्यमान नगरसेवकांचे तिकीट कापले, वाचा संपूर्ण यादी
उद्धव कांबळे यांनी या कृतीमागचे कारण सांगताना पक्षांतर्गत गोंधळावर बोट ठेवले. कांबळे यांच्या मते, मच्छिंद्र ढवळे नावाच्या व्यक्तीला पक्षातील कोणीही ओळखत नाही, तरीही त्यांनी ‘एबी’ फॉर्म मिळवून सादर केला. मी अनेक वर्षांपासून पक्षाचे काम करत आहे. वरिष्ठांनी मलाच अधिकृत उमेदवार असल्याचे सांगितले होते. तरीही ढवळे यांनी अर्ज भरल्याचे समजताच माझा संयम सुटला, असे कांबळे म्हणाले. ही आपली मोठी चूक असल्याचे मान्य करत, केवळ अन्यायाविरुद्धच्या रागातून हे घडल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई
निवडणूक कार्यालयात गोंधळ घालून सरकारी कागदपत्रांची नासधूस केल्याप्रकरणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पोलिसांत धाव घेतली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी उद्धव कांबळे यांना नोटीस बजावून चौकशी सुरू केली आहे.


