सोलापूर: सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणातील पाण्याच्या पातळीने फिप्टी पार केली आहे. दौंड येथून विसर्ग कमी झाला असला तरी गेल्या तीन दिवसात पुणे जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या, नाले आणि ओढे यांना पूर आला आहे. त्यामुळे मंगळवारी दौंडमधून विसर्ग वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तसेच बंडगार्डनमधून १४ हजार ५४५ चा विसर्ग येत असल्याने दौंडमधून मंगळवारी दुपारी २१ हजार क्युसेकचा विसर्ग धरणात येवून मिसळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
उजनी मंगळवारी सकाळी फिप्टी गाठून पुढे सरकणार आहे. गेल्या १५ वर्षांमध्ये प्रथमच जून महिन्यात उजनीने पन्नाशी गाठली आहे, असे जाणकार सांगतात. उजनीने जूनमध्येच पन्नाशी गाठली आहे. अन्यथा जूनमध्येच धरण कोरडे असायचे. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या जोरदार पावसामुळे दौंडच्या विसर्गात पुन्हा वाढ दिसून येत आहे, रविवारी सकाळी दौंडचा विसर्ग ४०२० क्युसेक होता त्यामध्ये वाढ होवून संध्याकाळी पर्यंत १६ हजार ६३४ क्युसेक झाला होता. पण त्यात घट होवून तो सोमवारी ११ हजार ७१९ क्युसेक झाला आहे. बंडगार्डनचा विसर्ग सोमवारी ४ वाजल्यापासून चालू झाल्यामुळे मंगळवारी सकाळपासून दौंड येथून येणाऱ्या विसर्गात वाढ होणार आहे. त्यामुळे उजनीच्या पाणीसाठ्यात सकाळपासून पुन्हा वेगाने वाढ होण्यास सुरवात होणार आहे दौंडचा विसर्ग उजनीत येण्यास जवळपास आठ ते दहा तास लागतात.
गेल्या पंधरा वर्षाच्या इतिहासामध्ये उजनी धरणाने मे मध्ये मायनसचा विळखा काढून प्लस मध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे. सोमवारी सायंकाळी सहाच्या माहितीनुसार धरण ४९.७२५ प्लसमध्ये आले होते. मंगळवारी सकाळी उजनी अर्धशतक गाठणार आहे. यंदाच्या पावसाळ्याचे साडे तीन महिने शिल्लक आहेत. त्यामुळे उजनी धरण १०० टक्के भरण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचे लक्ष उजनीतील पाणीसाठ्यावर लागले आहे. पण त्यात गेल्या २२ दिवसात जवळपास ७२% (मायनस २२.९८५ प्लस ४९.७२५) वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांमधून आनंद व्यक्त होतो आहे. पुणे जिल्ह्यातील होणाऱ्या पावसाने सोलापूरकरांना दिलासा दिला आहे.


