नवी दिल्ली : केंद्र सरकारने नवरात्राच्या मुहूर्तावर महिलांसाठी मोठी भेट जाहीर केली आहे. प्रधानमंत्री उज्जवला योजनेंतर्गत (PMUY) २०२५-२६ आर्थिक वर्षात २५ लाख नवीन मोफत एलपीजी गॅस कनेक्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेमुळे गरीब कुटुंबातील महिलांना स्वच्छ इंधनाची सुविधा मिळणार असून, त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सांगितले की, या विस्तारामुळे योजनेचा एकूण लाभार्थ्यांचा आकडा १०.५८ कोटींवर पोहोचेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सोशल मीडियावर याबाबत माहिती देत, ही योजना महिला सशक्तीकरणासाठी मील का दगड ठरेल, असे म्हटले आहे.
गरीब कुटुंबातील महिलांना मोठा दिलासा
२०१६ मध्ये सुरू झालेल्या या योजनेने आतापर्यंत १०.३३ कोटींहून अधिक कनेक्शन वितरित केले आहेत. चुलीच्या धुरामुळे होणाऱ्या आरोग्य समस्यांपासून मुक्ती देण्यासाठी आणि स्वच्छ इंधनाचा वापर वाढवण्यासाठी ही योजना राबवली जाते. नवीन २५ लाख कनेक्शनसाठी ६७६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून, यामुळे विशेषतः ग्रामीण आणि गरीब कुटुंबातील महिलांना मोठा दिलासा मिळेल.
योजनेचे फायदे आणि खास वैशिष्ट्ये काय?
- प्रत्येक नवीन कनेक्शनसाठी सरकार २,०५० रुपये खर्च करेल. यात सिलेंडर, गॅस स्टोव्ह (शेगडी), प्रेशर रेग्युलेटर आणि सुरक्षित होज मोफत मिळेल.
- लाभार्थ्यांना वर्षाला ९ रिफिलपर्यंत प्रति सिलेंडर ३०० रुपये सबसिडी मिळेल. यामुळे १४.२ किलोच्या सिलेंडरची किंमत केवळ ५५३ रुपये इतकी कमी होईल. (५ किलोच्या सिलेंडरसाठी प्रमाणात सबसिडी.)
- ग्रामीण भागातील महिलांना चुलीच्या धुरापासून मुक्ती मिळेल, ज्यामुळे आरोग्य आणि पर्यावरण संरक्षणाला चालना मिळेल.
कोण पात्र? अर्ज कसा करावा?
- पात्रता: गरीब कुटुंबातील (BPL) महिलांना प्राधान्य. एका कुटुंबात फक्त एकाच महिलेला लाभ मिळेल. ज्या कुटुंबात आधीच गॅस कनेक्शन नाही, तेच पात्र.
- अर्ज प्रक्रिया: pmuy.gov.in वर ऑनलाइन अर्ज किंवा जवळच्या गॅस एजन्सी/OMC कार्यालयात अर्ज सादर करावा. आवश्यक
- कागदपत्रे: आधार कार्ड, BPL प्रमाणपत्र, बँक खाते तपशील.


