नवी दिल्ली : सध्या टेक्नॉलॉजीच्या युगात अनेक गॅजेट्स लाँच केले जात आहेत. त्यात स्मार्टफोनपासून ते स्मार्ट होम गॅझेट्सपर्यंत घरातील अनेक डिव्हाईसेस इंटरनेटला जोडलेले असते. त्यामुळे, इंटरनेटच्या स्पीडमध्ये थोडासा जरी व्यत्यय आला तरी अनेक कामांवर परिणाम होतो. लोक स्पीड इंटरनेटसाठी महागड्या वायफाय प्लॅन्सचा वापर करतात. मात्र, तरीही अनेकांना लो स्पीडची समस्या जाणवते.
राउटरची जागा किंवा त्याच्या जवळ ठेवलेल्या वस्तूंमुळे देखील इंटरनेट स्पीड मंदावू शकतो. घरात वापरली जाणारी अनेक गॅझेट्स सिग्नलमध्ये व्यत्यय आणू शकतात आणि इंटरनेटचा स्पीड कमी करू शकतात. वायफाय राउटर २.४ GHz फ्रिक्वेन्सीवर काम करतात. या फ्रिक्वेन्सीवर चालणारी इतर उपकरणे सिग्नलमध्ये व्यत्यय आणू शकतात आणि गती कमी करू शकतात. त्यामुळे, जर राउटरजवळ सुरक्षा कॅमेरा लावला असेल, तर तो सिग्नलमध्ये व्यत्यय आणू शकतो. त्याचप्रमाणे, स्मार्ट टीव्ही देखील राउटरमधून येणारा सिग्नल कमकुवत करू शकतात.
जर तुमचा टीव्ही ब्लूटूथद्वारे स्पीकर्स किंवा साउंडबारला जोडलेला असेल, तर सिग्नलमध्ये व्यत्यय येण्याची शक्यता वाढते. जर तुम्ही स्मार्ट होम हब वापरत असाल, तर याचा परिणाम वायफायच्या वेगावरही होऊ शकतो. ही समस्या २.४ गिगाहर्ट्झ (GHz) बँड वापरणाऱ्या राउटर्समध्ये अधिक सामान्यपणे आढळते. आधुनिक राउटर्स ५ गिगाहर्ट्झ (GHz) आणि ६ गिगाहर्ट्झ (GHz) बँडला सपोर्ट करतात. तुमची इच्छा असल्यास तुम्ही या बँडवर काही उपकरणे जोडू शकता.


